Article Published in ‘Sakal’ – 18 Nov 2003


Hello all,

Following is my first article which was published in ‘Sakal’s Appointments supplement on Tue, 18th Nov 2003. (‘Sakal’ is a popular Marathi daily newspaper). I had a very huge response from readers of Sakal from Pune and Aurangabad after it got published. Thanks to Sakal Newspaper group. Thanks to ‘Horizon Graphics’ with whom I was working at that time. And also thanks to Mrs. Bhagyashri Garud for making a typed version of this article.

see also: English Version of this article and The second article published

Image of actual news paper page

दैनिक सकाळ, पुणे, दि. १८ नोव्हेंबर २००३

कॉम्पुटर ग्राफिक्स ३ डी अॅनिमेशन

जगभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक, औद्योगिक उलाढाल घडवून आणणार्‍या; तसेच अनेक कलाकारांसाठी एक नवी ज्ञानशाखा व उत्पन्नाचे नवे साधन ठरलेल्या, कॉम्प्युटर ग्राफिक्स क्षेत्राच्या 3D Animation शाखेविषयी.

 

‘द लायन किंग’, ‘टारझन’, टॉम अँड जेरी’, ‘टॉय स्टोरी’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘स्टार वॉर्स’, ‘द ममी’… हुशऽऽऽ… ही यादी न संपणारी आहे! दर्शकांना थक्क करून सोडणाऱ्या या सर्व कलाकृतींच्या मागे काय होते? एकच गोष्ट, ती म्हणजे अनेक कलाकारांची कमाल. वरील सर्व उदाहरणात एक मुख्य तंत्रज्ञान वापरले जाते, ते म्हणजे कॉम्प्युटर ग्राफिक्स (CG). त्याचा वापर करून हे कलाकार अनेक अशक्यप्राय गोष्टी आपल्याला दाखवतात. माहिती तंत्रज्ञानाच्या, या युगात लोकांच्या ह्रदयापर्यंत पोचणारे हे सर्वात प्रभावी माध्यम ठरलेले आहे. अर्थात या तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजन किंवा करमणुकीपुरता न राहता शैक्षणिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, जाहिरात, इंटरनेट, केसस्टडी, गेम डेव्हेलपमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.

कॉम्प्युटर ग्राफिक्स हे दुसरे तिसरे काही नसून, कागदावर चित्रे काढणे, विविध वस्तूंच्या कागद, पुठ्ठा इ. माध्यमांचा वापर करून प्रतिकृती तयार करणे, अशाच कलांची पुढची पायरी आहे. येथे संगणक हा फक्त मदतीपुरता असतो. त्यामुळे मेहनत करावीच लागते. या तंत्रज्ञानाचे वर्गीकरण पुढील काही प्रकारात करता येईल. १) ड्रॉइंग व पेंटिंग, २) इमेज/व्हिडिओ एडिटिंग, ३) 2D अॅनिमेशन, ४) वेब डिझायनिंग, DTP इ., ५) 3D मॉडेलिंग, अॅनिमेशन, ६) सिम्युलेशन व अॅनॅलिसीस, ७) पोस्ट प्रॉडक्शन व कंपोझिटिंग टेक्निक्स इ.

येथे गरजेनुसार वरील विविध तंत्रांचा योग्य प्रकारे वापर करणे हे वापरकर्त्याचे (USER) कसब असते. तंत्र हाताळण्याच्या पद्धतीनुसार द्विमितीय (2 Dimensional) व त्रिमितीय (3 Dimensional) असे दोन मुख्य प्रकार पडतात. 2D ग्राफिक्स व 2D अॅनिमेशन यांबद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध असल्यामुळे येथे आपण फक्त 3D तंत्रज्ञानाचा विचार करणार आहोत. त्यात त्रिमिती, 3DCG, मॉडेलिंग, अॅनिमेशन व त्याचा वापर इ. क्रमाक्रमाने पाहू या.

त्रिमिती: अस्तित्वात असणाऱ्या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू फक्त द्विमितीय नाही. अगदी तुम्ही वाचत असलेल्या या कागदालाही ठराविक जाडी आहे. म्हणजेच त्याला लांबी, रूंदी व जाडी अशा तीन मुख्य मिती आहेत. ज्यावेळी संगणकाच्या साहाय्याने वस्तूंच्या तीनही मितींचा विचार केला जातो व त्यानुसार त्यांची प्रतीरूपे (Model / Prototype) तयार केली जातात, त्यावेळी त्याला Three Dimensional Modeling म्हणतात. CG तंत्रज्ञानात त्रिमितीय परिमाणांचा वापर करून अत्यंत अचूक व वास्तववादी कलाकृती निर्माण करता येतात. या कलाकृतींमध्ये अर्थातच वस्तूंच्या पृष्ठभागावरील सर्व महत्त्वाच्या बिंदूंची तंतोतंत अंतरे, परिमाणे, पृष्ठभागाची रंगसंगती, पोत (Texture) इ. अनेक गोष्टी समाविष्ट असतात.

3DCG व मॉडेलिंग: ज्याप्रमाणे बिंदूंपासून रेषा, रेषेपासून पृष्ठभाग, पृष्ठभागापासून घन पदार्थ निश्चित होतो, त्याप्रमाणे 3DCG मध्येही या सर्व भौगोलिक व वैज्ञानिक संज्ञांचा वापर होतो, किंबहुना, त्याशिवाय 3DCG चीही व्याख्या होऊ शकत नाही. प्रतिरूप अथवा 3D मॉडेल तयार करताना वस्तूंच्या पृष्ठभागावरील सर्व महत्त्वाच्या शिरोबिंदूंची स्थाने निश्चित केली जातात. त्यासाठी ‘कार्टेशिअन’ आलेख पद्धतीचा सर्वात जास्त वापर केला जातो. ‘कार्टेशिअन’ हे नाव या पद्धतीचे जनक, प्रसिद्ध गणितज्ञ ‘रेने डिस्कार्टेस’ यांच्या नावावरून पडले आहे. अंतराळातील एखादा बिंदू मुख्य मानून त्याचे x, y, z निर्देशांक अनुक्रमे ०, ०, ० गृहीत धरले जातात. प्रतिकृती तयार करताना तिच्या प्रत्येक शिरोबिंदूचे x, y, z निर्देशांक हे या मुख्य बिंदूपासून, मोजले/ठरवले जातात. हे करताना फूट, इंच, मीटर, सेंटिमीटर इ. कोणतीही एकके वापरता येतात. जेणेकरून मोजमाप अचूक होईल. अशा प्रकारे सर्व शिरोबिंदूंची x, y, z स्थाने निश्चित झाल्यामुळे प्रतिरुपाच्या एकूण आकाराचा आभास किंवा अस्तित्व निर्माण होते.

वर लिहिलेले x, y, z निर्देशांक, कार्टेशिअन, भूमितीय संज्ञा, शिरोबिंदू, Profile, पृष्ठभाग इ. शब्द वाचून घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण यातील बहुतांशी भाग संगणक सांभाळतो व वापरकर्त्याला आपला वेळ प्रतिकृतीला जिवंतपणा व अचूकता आणण्यात घालवता येतो. या पद्धतीशिवायही कलाकार मुक्तपणे मॉडेल करू शकतो. ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे तो विविध आकार तयार करू शकतो. मोजमापे घेऊन व मुक्तपणे मॉडेल तयार झाल्यावर त्याच्यावरील रंगकाम, पृष्ठभागाचा पोत, चमकदारपणा, गुळगुळीतपणा, पारदर्शकता, प्रकाश शोषण्याची, परावर्तनाची किंवा अपवर्तनाची क्षमता इ. अनेक गोष्टी ठरविल्या जातात, योग्य प्रकाश योजना करून वास्तववादी भास आणला जातो.

अॅनिमेशन – अॅनिमेशन या शब्दाचा अर्थ ‘गतीचा वापर करून निर्जीव आकृत्यांना जिवंतपणा आल्याचा आभास निर्माण करणे’ होय. अॅनिमेशनचे काही प्रकार पुढीलप्रमाणे:

१) 2D अॅनिमेशन, २) 3D अॅनिमेशन, ३) स्टॉप मोशन (क्ले) अॅनिमेशन ४) पपेट शो इ. परंतु काम करण्याच्या तंत्रातील फरकानुसार अॅनिमेशनचे काही प्रमुख प्रकार पडतात, ते खालीलप्रमाणे:

१) फ्रेम बाय फ्रेम (सेल) अॅनिमेशन, २) की फ्रेम अॅनिमेशन, ३) प्रोसिजरल अॅनिमेशन, ४) सिम्युलेटेड अॅनिमेशन

) फ्रेम बाय फ्रेम ही पद्धत ही अॅनिमेशन तंत्राचा उगम म्हणता येईल व या पद्धतीतच सुधारणा होत होत इतर तंत्रे उदयास आली व आणखीही येत राहतील. ही पद्धत प्रामुख्याने 2D (or classical) अॅनिमेशन व स्टॉपमोशन अॅनिमेशनसाठी वापरली जाते. इतर सर्व पद्धती प्रामुख्याने 3D अॅनिमेशन तंत्रात वापरण्यात येतात.

) की फ्रेम (Key Frame) अॅनिमेशन – या तंत्रात कालगणनेनुसार वस्तूंच्या हालचालीतील मुख्य स्थिती (Key Poses) संगणकास वापरकर्त्याकडून पुरविल्या जातात. अशा प्रत्येक दोन स्थितीतील (Pose to Pose) फरकानुसार व त्यामधील कालखंडानुसार (Time segment) मधल्या हालचाली संगणक निश्चित करतो.

) प्रोसिजरल अॅनिमेशन – या तंत्रात Pose to Pose अॅनिमेशन न करता हालचालींबद्दल नियमावली दिली जाते, या पद्धतीचा वापर मुख्यतः अनेक प्रकारच्या क्लिष्ट हालचाली प्राप्त करण्यासाठी केला जातो.

) सिम्युलेटेड अॅनिमेशन किंवा Simulation या प्रकारात तर मॉडेलच्या आकार, रंग, पारदर्शकता इ. सारख्या गोष्टींबरोबरच त्या वस्तूचे वस्तुमान, स्थितिज व गतिज ऊर्जा, गुरुत्वमध्य, घर्षण, जडत्व इ. अनेक गोष्टी ठरवून वस्तूंची हालचाल साधता येते व जिवंतपणा आणला जातो.

CG व 3D मॉडेलिंगचा वापर प्रामुख्याने मनोरंजन, माहितीप्रधान, अभ्यासप्रधान मालिका, तसेच जाहिराती या क्षेत्रात या केला जातो, त्याची वर्गवारी अशी:

) मनोरंजनात्मक – चित्रपट काढणे, माहितीपट, अभ्यासात्मक कार्यक्रम तयार करणे इ., तसेच चित्रपटात Titles व स्पे. इफेक्ट्ससाठीही याचा वापर केला जातो.

) आर्किटेक्चरल प्रेझेंटेशन – बाह्य व अंतर्गत वास्तुरचनेची 3D प्रतिरूपे तयार करून त्यांचा अभ्यास करणे, उदा. अशा प्रतिरूपांचा वापर स्केल, Scale, Proportion, Balance, Contrast, Reach, Clearance, Circulation इ. अनेक मूलभूत रचनातत्त्वांचा अभ्यास करण्यासाठी तसेच प्रकाश योजना, रंगसंगती, व्हॉल्युमेट्रिक अॅनॅलिसिस, सर्व्हेइंग इ. साठी करण्यात येतो. जमिनीच्या अक्षांश, रेखांश इ. माहितीवरून तेथील वास्तूला वर्षभरात ठराविक दिवशी, ठराविक वेळी, कुठून व किती सूर्यप्रकाश लाभेल, याचाही अभ्यास करता येतो. याशिवाय जाहिरात करणे व एखाद्या वास्तूबद्दल इच्छुकांना चलचित्र स्वरुपात योग्य माहिती पुरवणे इ. उपयोग आहेतच.

) अभियांत्रिकी, औद्योगिक – एखाद्या यंत्राचा भाग (Final product) तयार होण्यासाठी तिच्या 3D prototype चा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. अशा भागांची हालचाल, त्यांनी व्यापलेली जागा इ. गोष्टी दृश्य आणि पृथक्करण स्वरुपांत प्राप्त करता येतात. त्यानुसार त्यांच्या रचनेत सुधारणा करणे, यंत्राच्या कार्याची दृकश्राव्य माध्यमांतून विद्यार्थ्यांना/ इच्छुकांना ओळख करून देणे व त्यांचा अभ्यास करणे, याशिवाय Production Cost कमी करणे इ. करिता 3DCG चा मोठ्या प्रमाणात वापार केला जातो.

या क्षेत्राकडे कोण वळू शकते?’ कॉम्प्युटर ग्राफिक्स हे चित्रपट किंवा औद्योगिक शाखांसारखेच विस्तृत असल्यामुळे त्यात अनेक शाखा, उपशाखा आहेत. वापरकर्त्याच्या कुशलतेप्रमाणे व आवडीप्रमाणे त्यात काही प्रकार पडतात. स्क्रिप्ट रायटिंग, स्टोरीबोर्ड मेकिंग, लेआऊट व बॅकग्राऊंड डिझायनिंग, 3D मॉडेलिंग, अॅनिमेशन इ. या क्षेत्रात वळल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करताना कलाकारांना दिग्दर्शक, सेट डिझायनर, अॅक्टर, एडिटर, लाईट्स, व कॅमेरा डायरेक्टर, सिनेमॅटोग्राफर इ. अनेक व्यक्तिमत्त्वे धारण करण्यास वाव मिळतो.

साधारणपणे शैक्षणिक पात्रतेची अट नसली तरी ती एक जमेची बाजू निश्चितच ठरते. उदा. शालेय ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेले, अभियांत्रिकी/ वास्तुरचनाकार, तसेच आरेखन इ. क्षेत्रांतील व्यक्तींकडील भूमितीचे/ त्रिमितीचे ज्ञान निश्चितच मार्गदर्शक ठरते. एखादी वस्तू समोरून, बाजूने, वरून इ. कशी आहे याचे आकलन लवकर होण्यात भरपूर मदत मिळते. कलेची आवड, प्रयोगशील वृत्ती, दीर्घकाळ अभ्यास व काम करत राहण्याचे धैर्य, निरीक्षणक्षमता इ. अनेक गुण या क्षेत्रात वाळू पाहणाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.

शिक्षण कुठे मिळवावे: वर लिहिल्याप्रमाणे स्वतः अनेक दिवस परिश्रम करणे, धैर्य राखणे आवश्यक असले तरी त्यांना योग्य प्रकारे, योग्य व्यक्तींकडून, पूर्ण शिक्षण मिळणे फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे शिक्षण घेण्याआधी खालील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी हे निश्चित करावे, की त्या संस्थेमध्ये इच्छित आज्ञाप्रणालींची (Software) अधिकृत प्रत (Legal Version) आहे. नसल्यास अशा संस्था शिक्षण देण्यास अपात्र असतात. जगभरात दिवसेंदिवस वाढत असलेले सायबर लॉज’चे पालन येत्या एक-दोन वर्षांत भारतभरही वाढेल. त्या अनुषंगाने विद्यार्थी, प्रशिक्षण संस्था इ. कोणीही अधिकृत सॉफ्टवेअर वापरणे अनिवार्य आहे. अधिकृत सॉफ्टवेअर नसणाऱ्यां संस्थांनी दिलेली सर्टिफिकेट जगभरातील कुठेही ग्राह्य धरली जात नाहीत.

इच्छुक व्यक्ती ज्या वेळी विविध संस्थांमध्ये माहिती मिळवण्यासाठी जातात त्या वेळी बर्याच संस्था/ व्यक्ती Demonstration च्या नावाखाली संस्थेतर व्यक्तींनी केलेल्या कलाकृती, चित्रपटातील (मुख्यतः हॉलीवूड) स्पेशल इफेक्ट्स दृश्ये इ. दाखवतात. असे DEMO हे ठराविक सॉफ्टवेअर काय करू शकते हे निश्चितच दर्शवितात; परंतु ते शिकविणाऱ्या संस्था किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षक काय करू शकतात, ते विद्यार्थ्यांना काय व किती ज्ञान देऊ शकतात व त्यामुळे शिकणारी व्यक्ती किती कुशल बनू शकते, हे निश्चितच दर्शवीत नाहीत. अशा Demonstrations ला भुलून व्यक्ती पूर्ण माहितीशिवाय प्रवेश निश्चित करतात, योग्य शिक्षणाच्या अभावी विद्यार्थ्यांची पूर्णतः फसगत होऊ शकते.

– महेश देशपांडे

Advertisements

3 thoughts on “Article Published in ‘Sakal’ – 18 Nov 2003

  1. Pingback: English Version of my first article – 18 Nov 2003 | mahesh deshpande

  2. Pingback: Article 2 Published in ‘Sakal’ on 19 NOV 2004 | mahesh deshpande

  3. Pingback: प्रस्तावना | Advaita Studios

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s